Saturday, April 12, 2014

एखादा चोर यावा अन् चोरून न्यावं त्यानं सगळं!!!
सगळी दु:ख, सगळ्या यातना, 
बोचरे शब्द अन् अवहेलना.....

चोराला अगदी सहज सापडावी 
चावी मनाच्या तिजोरीची
त्यात दडवून ठेवलेल्या ..
काही सांभाळून ठेवलेल्या..
काही असलेल्या परंतू नसल्यासारख्या..
अनंत गोष्टींवर त्याने हात साफ करावा 
पण बोटांचे ठसे उमटणार नाहीत 
याची काळजी घेवून
रीतं मन मात्र त्याने ठेवून जावं
मला जगता यावं म्हणून
आणि 
जातांना पुन्हा यायचं वचन देवून जावं
मन पुन्हा रीतं करता यावं म्हणून..

-जयंत पवार

Sunday, April 6, 2014

कल्पनेतलं थोडसं....

कल्पनेतलं  थोडसं.... 




असं काय कमावलंय मी कि मला गमवायची भीती वाटतेय; उगाच भीत भीत आतापर्यंत काही कमवायचंही राहून गेलं.
मुळातच सुमार बुद्धीमत्ता, कल्पनाशक्तीच दारिद्र्य, कुठलाही विशेष गुण नाही, कुठलीही विशेष कला अवगत नाही, उत्तम personality नाही कि काही करायची ambition नाही. 
रोज उठून नशिबाला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे. 
का उगाच अट्टाहास हेच करणार अन तेच करणार चा. नाही न सगळ्यांनाच सगळं शक्य होत कधी कधी. 
सगळेच शिवाजी किंवा सगळेच विवेकानंद झाले तर कसं चालेल? 
कढईत पडलेल्या मक्याच्या दाण्यासारखं झालंय. प्रत्येक दाण्याचा पोप्कॉर्ण झालाच पाहिजे. नाही होत काही काही दाण्यांचा पोप्कॉर्ण. मग त्या दाण्याला कळलं पाहिजे कि पोप्कॉर्ण बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या उपरवाल्याला?
राजू बेडरूम च्या फ्रेंच विंडो मध्ये बसून विचार करत होता. विचार करण्यात आणि नशिबाला दोष देण्यांत मी जेवढा वेळ घालवला तेवढा वेळ इतर चांगल्या गोष्टीसाठी दिला असता तर .... तर आज सोमवारी इथे बेडरूम च्या खिडकीत बसून विचार करत नसतो तर स्वतःच्या ऑफिसच्या केबिन मध्ये बसून काम करत असतो. 
असो काही बदल होणार असेल तर असल्या विचारांचा फायदा आहे. 
अंघोळ करावी. शोवर चालू झाला. 

बाईक कुठे उभी करू ... आडोसा कुठे शोधू .... केवढा हा पावूस अचानक ... 
हुश्ह... आता हा थांबेपर्यंत इथेच उभा राहतो ... 
स्वतःशीच हसत राजू विचार करत होता .... पावसाळ्यात पावूस येणार हे माहित असतानाही आपण पावसाला का दोष देतो 
अचानक आला असं का म्हणतो .... 
"एस्कुज मी..."
"अंधेरी MIDC ला जाण्यासाठी इथून बस मिळेल न?"
राजूने वळून पाहण्याआधीच तिचा दुसरा प्रश्न येवून आदळला. 
"हो बहुतेक... पण मलाही नक्की माहित नाही... मी बाईक ने travel करतो... पावूस आल्यामुळे थांबलोय"
"ओह्ह ... okkkey" असं म्हणत वाजत असलेला फोन तिने उचलला. कोणत्या तरी फिल्म ला किंवा सिरिअलला काहीतरी काम करत असावी. उशीर झाला असणार तिला. रिक्षा संप असल्यामुळे बस साठी आलीय. 
दिसायला बरी आहे... पण केस का बांधून ठेवलेत? वाऱ्यावर उडण्याचा केसांचा मुलभूत हक्क का हिरावून घेतेय हि?
जावू दे एकदाही पहिल नाही तिने माझ्याकडे... 

पावूस थांबला... बाईक ची seat पुसून... हेल्मेट डोक्यात अडकवून राजूने unicorn ला कीक मारली (राजू ची बाईक कधीच button start होत नाही) तेवढ्यात पुन्हा "एस्कुज मी..."
कुठल्याश्या जेमिनी नावाच्या कंपनी जवळ तिला सोडून राजू गेला अंधेरी वेस्ट ला. 
interview साठी बरीच गर्दी होती. 
छान झाला interview . जॉबही  मिळेल कदाचित.

अंघोळ करून बाहेर आला. कपडे केले. चहा घेतला.
स्वतःच्या i20 वर फडका मारून तो निघाला हायवे च्या दिशेने.
रोज उठतो अन असा  जातो. कुठे जायच, काय करायच, काही ठरलेल नसतं. 
पण काहीतरी शोधत मात्र असतो.
काय शोधतोय हे त्याला कळलं असत तर सापडल हि असत कदाचित 

:क्रमश: 

जयंत पवार 

Thursday, April 3, 2014




तु मला विसरलीस, तेंव्हा
पाऊस नवा होता
आताही नवखेपणानेच
तो तुला आठवण्याचा प्रयत्न करत होता

विसरण्यात तुलाही, तुझ्याच
आठवणी लपल्या होत्या
तुला आठवत नसेल कदाचित
पण त्या सावल्याही आपल्याच होत्या

आपल्याच सावल्यांत
आपल्याच सावलीचे घर होते
प्रेमात तुझ्या, आठवणीत माझ्या
अश्रुंचे तेच ओले थर होते
-jp

Saturday, July 27, 2013

आज सकाळ झालीच नाही जणू … ढगांनी सूर्याला कुठे लपवलय कुणास ठावूक … 
कि तो स्वत:हून लपलाय कुणास ठावूक …. 
खरं तर खूप मस्त चं romantic वाटतंय सकाळपासून 
ताई किंवा दादाच्या लग्नात लहान मुलं कशी हुंदडत असतात इकडून तिकडे 
तसच काहीस पक्ष्यांचा झालय …. 
मातीच्या मनातला आनंद सुगंधु लागलाय … 
डांबरी रस्त्याला तेज चढलय … 
आपलं आवडतं कुणीतरी न सांगता अचानक आलं तर केवढा आनंद होईल…. तेवढाच झालाय आज 
आता तू थांब जावू नकोस…. खूप वाट पाहायला लावतोस दरवर्षी … यावेळेस वाट पाहायला लावली नाहीस असं नाही
पण तू वेळेत आलायस…. मीच जरा आधीपासून तुझी वाट पाहत होतो …
तू पड …. खूप पड … इतका पड कि तू नव्हतास हे विसरून जावू दे मला …
तू नसलास कि तुझी किंमत कळते … आता तू असताना तुझी किंमत कळावी इतका पड ,,,
अश्रू ने ओली झालेली माती आनंदअश्रुंनी ओली होईल इतका पड … 


जयंत पवार 

Saturday, June 22, 2013

23rd june 2013

"आज फार काही बरं सुचत नाहीय ….
कुणास ठाऊक का ?
पण उगीचच खूप अस्वस्थ वाटतंय ….
काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय … काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय …
पण काय राहून गेलंय ? काय विसरलंय ? "
प्रश्न…
"आयुष्यात बरचं  काही राहून जातं… आणि बरंच काही विसरलहि जातं (अनेकदा ठरवूनच )…
पण नेमक काय विसरलयं  अन काय राहून गेलयं ते आत्ता..  या क्षणी तरी आठवत नाहीय …
खूप प्रयत्न करतोय … पण छे … नाहीच आठवत …
खूप एकटं एकटं  वाटतंय … एका पोकळीत मी आहे अस वाटतंय … "

राजू तंद्रीत बसला होता … बायको नव्या नवरी सारखी नटून आली …

"वट पोर्णिमा आहे आज … आज पहिल्यांदा कुणीतरी मला repeat करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करणार आहे …
हि आज खूप खुश होती ….
मी काहीतरी गमावल्याच्या दु:खात बसलो होतो … पण हि मात्र मला मिळवलयं…  सात जन्मांसाठी ….
याच आनंदात होती … देवाला आज तसं सांगणार हि आहे हि …
पण खरचं मी आहे का हिच्यासोबत?
 निदान या जन्मासाठी तरी ?"
बोचणारा प्रश्न …
"हि मला सर्वस्व समझते … हिच्या आयुष्यात फक्त मीच आहे …. माझ्या पलीकडे आमच्या हीच जगचं  नाही …
हीच जग माझ्यापासून सुरु होतं आणि माझ्यापाशीच संपतं …
पण माझं तसं आहे का ? माझं  जग अजून हि तिच्या बरोबरच  सुरु होतं …. अन तिच्याच सोबत आहे मी … संपतच नाही …
संपवायचं आहे … पण … नाही संपत … "

"मी सात जन्म मिळावा म्हणून हि वडाला साकडं घालून आली होती आणि पुढचे सातही जन्म हि हेच साकडं घालणार  होती …

पुरुषांसाठी का नसतो असा वड किंवा असं  एखादं झाड कि ज्याला फेरे मारून कोणाला तरी कायमचं मागता येईल … ?
पुरुषांना नाही वाटत का कोणासोबत तरी पुढचे काही जन्म काढावेत ?
काही जन्म नाही निदान हा जन्म तरी काढावा… ?
कि देवालाच वाटत नाही असं कि पुरुषांच्या इच्छेप्रमाणे व्हावं?

मला तिला स्विकारता नाही आलं…
किंवा तिने मला नाही स्वीकारलं…
 हिने मला स्विकारलयं…
हिच्या मनासारखं  झालय कि मनाविरुद्ध ?
माहित नाही
पण हिने मला स्विकारलयं… अगदी मनापासून …
पण माझं  काय ??
माझं काय ?

आता मीच वडाला साकडं घालायचं ठरवलंय…
मला तिच्या आठवणीतून … तिच्या जगातून बाहेर काढ …
मला आता हिच्या सोबत जगायचय
हिच्या साठी जगायचय
पुढचे सगळेच जन्म ……

"??????????"

- जयंत पवार


Saturday, June 15, 2013

16 june 2013

पाऊस … धो धो पाऊस …. वेड्यासारखा पाऊस …
इतका पाऊस…  इतका पाऊस….  इतका पाऊस… 
इतका पाऊस कि सगळ विसरायला लावणारा
इतका पाऊस कि खूप प्रयत्नाने पुसलेलं  पुन्हा गिरवणारा

राजू तिच्या आणि त्याच्या नेहमीच्या जागी आला होता …
पावसाचे थेंब उडत होते चेह-यावर ….
पण आज त्याला पावसाचा त्रास होत नव्हता …
राजू च्या गालावर पावसाचे थेंब होते कि ……………… तिच्या विरहाचे ???

तसाच उभा होता … बराच वेळ

उभा असायचा बराच वेळ पावसात तिची वाट पाहत
खरं  तर त्याला पाऊस आवडायचा नाही … वैतागायचा तो पावसात तिची वाट पाहताना
गाड्यांमुळे अंगावर चिखल उडू नये म्हणून त्याची खूप धडपड चाले
छत्री उडवायला येणाऱ्या वा-यावर त्याचा विशेष राग …
"या पावसाला सरळ एका रेषेत पडताच येत नाही … तिरका पडून , माझ्या छत्रीत घुसून मला मुद्दाम भिजवतो हा "
राजूची नेहमीची तक्रार
तिला हसू हि येतं  आणि खूप छान हि वाटत
"यामुळेच तू मला खूप आवडतोस" असं  ती राजूला नेहमी म्हणत असे आणि तसं  म्हणताना त्याच्या केसातून हात फिरवत असे

केसातून हात फिरवून पावसाचे थेंब राजूने झटकले …  पाऊसपण  खूप हट्टी …तिच्या आठवणी सारखा …. पुन्हा पावसाचे थेंब राजूच्या डोक्यात

"एका छत्रीतून चालण्याचा तुझा हट्ट का?"  राजू ची चिडचिड
ती त्याचा हात धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे चालतेय

"खूप भिजायला होतं ग "
"त्याचसाठी तर पाऊस येतो रे"
"भिजू नये म्हणूनच छत्री बनवलीय न? मग छत्री बनवणारे वेडे आहेत का ?  "
"खूप शहाणे आहेत " असं  म्हणून तिने त्याचा हात जर घट्टच पकडला …

ती रस्त्यात साचलेल्या पाण्यात निर्धास्त पणे पाय टाकत चालत होती
त्याचा मात्र साचलेल पाणी  चुकवण्याचा केविलवाणा प्रयत्न …

त्याचा चेह-यावर अजूनही खूप थेंब होते … पावसाचे ??? … कि ……

जयंत पवार

Friday, June 14, 2013

15th june 2013


बायकोने आज छान चिकन केलं होतं जेवायला
पण मीठ कमी पडलं .

"मीठ कमी आहे…  मीठ दे "  राजू ची order

बायकोने मीठ आणून दिलं … मीठ टाकताच चिकनला त्याची स्वत:ची अशी चव आली ….

"मीठ सुयोग्य प्रमाणात असतं तर मला मिठाची आठवण आली असती का?

जेवणात मीठ असतं तेंव्हा ते आहे याची आठवणही होत नाही … ते नसतं तेंव्हा त्याचं नसलेपण जाणवतं ….

मिठाला स्वतंत्र अस्तित्व नसतच मुळी … मीठ खारट असतं … जेवणात मिसळल्यावर ते जेवणाची चव वाढवतं ….

काही माणसं अशीच असतात का मिठासारखी …. ??? "


राजू बेडरूम मध्ये येरझा-या घालत होता …

"आयुष्यात सगळे असतानाही आपण एकटेच आहोत … "

…. मनातली सल … 

…. येरझा-या चालूच होत्या …

"का नाही मी कोणासाठी महत्वाचा … ?
का माझ्या मित्रांना मी महत्वाचा वाटत नाही … ?
का माझ्या रक्ताच्या नात्याला माझं महत्व कळत नाही … ?
तिला तर मी नसतानाच माझी आठवण जास्त येत होती … सोबत असायचो  तेंव्हा मात्र ती तशी नाही वागली कधीही  …. का ?


पण हीच मात्र तसं नाही … मी सोबत असतानाही हि  मला खूप miss करते …
पण तसं दाखवत मात्र नाही …
माझ्या मनातलं दु:ख ती ओठांनी अलगद टिपून घेते …
माझ्या डोळ्यात बघून तिला माझ्या मनातली सल कळते …. केसांमधून हात फ़िरवते…
काळजी घेते खूप … "


राजू बेड वर डोळे मिटून शांत पडला होता … पण झोपला मात्र नव्हता …
"हि  आली …माझा संसार नेटका व्हावा म्हणून दिवसभर राबून हि  आली … अंगावर पांघरून घातलं  … आणि शांत झोपली … "

राजू जागाच होता … बायकोकडे पाहत होता … पाहण्याचा प्रयत्न करत होता … पहिल्यांदा ….

" खरंच  मीठ कोण आहे? "
"मी कि हि ?"


- जयंत पवार